Tuesday, July 18, 2023

 तंत्र  धर्म धम्म आणि मराठी कविता श्रीधर तिळवे नाईक 

तंत्र म्हणजे मोक्ष मिळवण्याची जीवनशैली जी कामातून जन्मते अर्थातून वाढत जाते आणि स्थावर व जंगम ह्यांचा समतोल साधत मोक्षात शिवात लय पावते ह्या तंत्रातूनच पुढे शैव धम्म तंत्रशृती निर्माण झाल्या व पुढे आदीशैव धम्म  धर्म वा मूळ शैव धम्म , लोकशैवधम्म , नवशैवधम्म निर्माण झाले 

मजहब किंवा रिलिजन  म्हणजे श्रद्धेच्या आधारे निर्माण केलेली कायदेसंहिता व तिच्या आधारे निर्माण केलेली स्थिर  जीवनशैली ह्यात प्रामुख्याने झोरोष्ट्रियन , ज्यू , ख्रिश्चन व इस्लाम हे रिलिजन येतात 

धर्म म्हणजे श्रद्धेच्या आधारे निर्माण केलेली कायदेसंहिता व तिच्या आधारे निर्माण केलेली केऑस व डिसऑर्डर निर्माण करणारी केऑटिक डीसऑर्डरड जीवनशैली जी वर्णजात निर्माण करते स्वीकारते मात्र मोक्षाला प्रोत्साहन देते जागा देते समाजाला केऑसमध्ये फेकून आर्यांना म्हणजे वर्णजात व्यवस्था प्रमाण मानणाऱ्या क्षत्रिय ब्राम्हणांना उच्च स्थानी ठेवते ह्यात प्रामुख्याने ब्राह्मणधर्म , वैष्णवधर्म व हिंदुधर्म हे तीन धर्म येतात 

धम्म म्हणजे धर्मवर्णजातींना नाकारून तंत्र वा दर्शन आणि त्याआधारे निर्माण केलेली जीवनशैली ! ह्यात प्रामुख्याने सांख्य , जैन , बौद्ध हे धम्म येतात 

मराठीचे दोन्ही आद्य ग्रंथ गाथासप्तशती व गुणाढ्याचे बृहत्कथा हे शैव तंत्रातून धम्मातून जन्मले आहेत आणि त्यांचाच प्रभाव साहित्यिक महाराष्ट्रावर होता मात्र आद्यशंकराचार्यांच्यानंतर चित्र बदलले इसवीसन  १००० नंतर विवेकसिंधु हा वेदांतधर्मी ग्रंथ जन्मला यादवकाळात द्विवर्णीय श्रुतिस्मृतिपुराणोक्त हिंदू धर्म जन्मला ज्ञानेश्वरी व नामदेवाची गाथा यांनी वैष्णव धर्म वारकरी संप्रदाय म्हणून उभा केला तर ज्ञाननाथांनी अनुभवामृत लिहून शैव धर्म जिवंत ठेवला मराठीत चक्रधरांनी नववैष्णव धम्म उभा केला दक्षिण महाराष्ट्रात बसवेश्वरांचा नवशैव धम्म लिंगायत पोहचला मात्र मराठी संस्कृतीत मोक्ष मिळवणारे चार प्रभावी साहित्यिक चक्रधर , नामदेव , एकनाथ व तुकाराम हे वैष्णवधर्मी असल्याने महाजन मराठी संस्कृती ही वैष्णव धर्मी झाली आणि शैवांना शूद्र ठरवणारी वैष्णव जीवनशैली खुद्द शैवांनी स्वीकारली हे म्हणजे गुलामांनी स्वतःहून तुरुंग स्वीकारणे होते काहीकाळ शिवाजी व संभाजी राजांनी व शिवशाहीने त्याला शह दिला पण हा शंभर वर्षांचा इतिहास मस्तानीचे निमित्त करून बाजीरावाला गिळून आर्य ब्राह्मणशाहीने गिळला उत्तरपेशवाईत नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त वैष्णव धर्म महाराष्ट्रात बहरला त्याने जन्मजडित वर्णजातिव्यवस्था स्वीकारली अस्पृश्यता स्वीकारली मनुस्मृतीतले अनेक कायदे स्वीकारले ब्राम्हण व शूद्र हे दोन वर्ण स्वीकारले साहजिकच रामायण व महाभारत मराठी साहित्य संस्कृतीच्याही केंद्रस्थानी आले रामायण महाभारताच्या अनेक भागांचे अनुवाद किंवा अनुसर्जन झाले अनेक शैवांनी ह्याच काळात गीता स्वीकारली तिचे अनेक मराठी अवतार अवतारायला लागले पण सर्वाधिक प्रतिसाद ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिकेला मिळाला 

पेशवाईच्या पाडावानंतर महाराष्ट्रात प्रथमच सत्यशोधक समाज हा नवशैव समाज आला पण त्यात मोक्ष न स्वीकारल्याने बहुतांशी शैवांनी तो नाकारला अनेकांनी तो ख्रिश्चन धर्माची शाखा असल्याची टीका केली ह्याचा पुरेपूर फायदा वैष्णव धर्माला मिळाला आता वैष्णव धर्म गीता धर्म म्हणून आला गीता वर्णव्यवस्था स्वीकारत असल्याने गीता मानणाऱ्या अनेकांनी वर्णव्यवस्था स्वीकारली टिळक हे ह्यांचे अर्ध्वयू होते अगदी महात्मा गांधीही गीताधर्मी होते तोवर वर्णजात मानत होते पुढे ते चक्रधरांच्या वर्णजात न मानणाऱ्या नववैष्णव धम्मात दाखल झाले 

रानडे ह्यांनी वेदांत आणि वारकरी धर्म स्वीकारल्याने त्याचाही प्रभाव पडला पुढे गोक्षले व गांधी ह्यांनीही गीता व वेदांत स्वीकारला 

साहजिकच मराठीत केशवसुत , सावरकर वैग्रे सर्व वेदांती होते अगदी मर्ढेकर विंदा करंदीकर हेही वेदांती होते करंदीकर तर मार्क्सवादी असूनही वेदांती होते 

बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण त्याचे साहित्यीक परिणाम साठोत्तरीत निपजले यशवंत महानोर म्हणतात तसे 

मला आनंद देत नाही कुठलीही कला 

सृष्टीच्या नाना लीला 

छळतात सारी  शास्त्रे पुराणे वेदांत 

गळा आवळणारे नाना धर्मपंथ 

असं म्हणत हे साहित्य अवतरले 

नामदेव ढसाळांची व्यवस्थेच्या डोक्यात दगड घालायला निघालेली ही कविता पहा 

वडारी दगडांना स्वप्न देतात ..

मी फुलबाजा पेटवतो …

बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …

उतरतो … कानाकोपरा खाजवतो …

वडारी दगडांना फुलं देतात …

मी बेंडबाजा वाजवतो …

चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….

कातळलेला उभा पारशी ओलांडतो …

बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….

अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो , उसमडतो …

वडारी दगडांना गरोदर ठेवतात …

मी थकलेले घोडे मोजतो …

स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो , जळतो ….

वडारी दगडांना रक्तात मिसळतात

मी दगड वाहतो …

वडारी दगडाचं घर करतात …

मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …

किंवा 

हा भाकरीचा जाहीरनामा 

हा संसदेचा रंडीखाना 

ही देश नावाची आई 

राजरोस निजते कुबेराच्या सोबत 

असं ढसाळ ठणकावतात आणि 

तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत? 

बाकीचे कुत्र्या-मांजराच्या! 

असा प्रश्नही विचारतात 

साठोत्तरी पिढीने पुन्हा एकदा वारकरी वैष्णव धर्म  व बौद्ध धम्म केंद्रस्थानी आणले आणि आजही ह्या दोन्हींचा प्रचंड प्रभाव मराठी साहित्यिकांच्यावर प्रचंड आहे एका अर्थाने जो पुरोगामी प्रोजेक्ट १९ व्या शतकात पूर्ण व्हायला पाहिजे होता तो पूर्ण करण्याचा प्रयत्न देशीवाद करतो तो अनेक वास्तवे सादर करतो जे वास्तववादाने करायचे काम होते पण जे ब्राह्मणी प्रभावामुळे व वर्णजातीमुळे अपूर्ण राहिले वेदांती प्रभावाने जी आत्मग्लानी मराठी लेखकांना प्राप्त झाली होती ती ग्लानी देशीवादाने अनेक जाती जमातींची वास्तवे कादंबरी व आत्मचरित्राद्वारा सादर करून उडवली व ब्राह्मणीपणाला ताळ्यावर आणले तुम्ही पाहता ते जग ३ टक्क्यांचे आहे त्याचा उर्वरित भारतीय समाजाशी संबंध नाही असे ठणकावले पुरोगामी वादाच्या काळात वारकरी व गीताधर्म केंद्रस्थानी आल्यावर साहजिकच हेच केंद्रस्थानी राहिले 

चित्रे व अरुण कोलटकर ह्यांनी शैव धम्माला काही प्रमाणात व्यक्त केले तरी त्यात प्राण न्हवता अरुण कोलटकरांनी जेजुरीमध्ये जे काही लिहिलंय त्याला शैव म्हणावं कि नाही ह्याबद्दल मला शंका आहे ह्या कविता आउटसायडरच्या कविता जास्त वाटतात तर चित्र्यांच्या शैव कविता म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाची  लैंगिक तांत्रिक बजबजपुरी आहे ज्यात ना साधक आहे ना साधना ! केवळ देशीवादी धुळवड उडवायची म्हणून उठवलेली उठवळ असे त्याचे अनेकदा स्वरूप होते त्याउलट ते वारकरी वैष्णव धर्मात घुसतात तेव्हा जोमदार होतात हेच अरुण कोलटकरांचेही होते मात्र धार्मिक परंपरेचे ते जेव्हा उत्तराधुनिकीकरण करतात तेव्हा मजा येते उदा त्यांची ही कविता पहा 


वामांगी


देवळात गेलो होतो मधे

तिथ विठ्ठल काही दिसेना

रखमाय शेजारी

नुसती वीट


मी म्हणालो ऱ्हायल

रखमाय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोक ठेवायच


पायावर ठेवलेल डोक

काढून घेतल

आपल्यालाच पुढ माग

लागेल म्हणून


आणि जाता जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठ गेला

दिसत नाही


रख्माय म्हणाली

कुठ गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला


मी परत पाह्यल

खात्री करुन घ्यायला

आणि म्हणालो तिथ

कोणीही नाही


म्हणते नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूच मला जरा

कमीच दिसत


दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकड जरा

होत नाही


कधी येतो कधी जातो

कुठ जातो काय करतो

मला काही काही

माहिती नाही


खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले


आषाढी कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कस कुणी

सांगितल नाही


आज एकदमच मला

भेटायला धावून आल

अठ्ठावीस युगांच

एकटेपण


कवितासंग्रह - चिरीमिरी

प्रकाशन  : प्रास प्रकाशन

इथं एका बाजूला वारकरी धर्म आहे तर दुसऱ्या बाजूला धार्मिक परंपरेला तिरकसपणे गंमतीशीरपणे पाहण्याचा हसताखेळता उत्तराधुनिक दृष्टिकोन आहे जेजुरीमध्ये जे साधलं न्हवतं ते इथं साधलं आहे कथ्थ्य कविता असूनही लिरिकल बाज कायम आहे मात्र यमकबंदिश सर्वत्र पाळलेली नाहीये 

साहजिकच आमच्या नव्वदोत्तरी पिढीवर वारकरी वैष्णव आणि बौद्ध कोलीजन करून जोरदारपणे आदळले . अरुण काळे महेंद्र भवरे प्रज्ञा लोखंडे ह्यासारख्या अनेकांनी साठोत्तरी नवबौद्ध संवेदनशीलता नामदेव ढसाळप्रमाणे अभिमानाने मिरवली  

ह्या पार्श्वभूमीवर माझी वैयक्तिक चांगलीच गोची झाली घरात रवळनाथाचे मंदिर असल्याने शैव संवेदनशीलता घरगुती होती ती सहज माझ्या आयुष्यात आली सुरवातीला माझे लेखन लोकायती होते कारण डाव्यांचा प्रभाव पण शक्तीपाताने सगळेच बदलल्याने शैव संवेदनशीलता सहज उमटायला लागली पुढे जे कृष्णमूर्ती , ओशो ,आंबेडकरांच्या प्रभावाने बौद्ध आले नवबौद्ध हे त्या काळात एकमेव असे होते जे वारकरी परंपरेविरुद्ध ठाम उभे ठाकले वारकरी संतांनी वर्णजातीबाबत काहीच केले नाही उलट त्यांनी वर्णजात मजबूत केली असे दलित साहित्याने ठणकावून सांगितले महाराष्ट्रातील बौद्ध परंपरा त्यांनी शोधायला सुरवात केली आंबेडकरवादी पुरोगामीवाद फार काळ टिकला नाही आमच्या पिढीत १९९० नंतर तर काही दलित लोकांनी  वारकरी संप्रदायाशी आणि विठ्ठलाशी जुळवून घ्यायला सुरवात केली संत चोखा महार व संत सोयराबाई ह्यांचे अभंग QUOTE करण्यात येऊ लागले उदा संत चोख्याचा हा अभंग 

आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥

सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥

आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥

चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥


चोखांचा एक अभंग रामावरही आहे 

अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥

हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥

क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥

चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

किंवा सोयराबाईंचा हा अभंग 

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंडरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥

किंवा खालच्या अभंगातील 

पंढरीचे ब्राम्हणे चोख्यासी छळीले । तयालागीं केले नवल देवें ॥१॥

सकळ समुदाव चोखियाचे घरी । रिध्दी सिध्दि द्वारी तिष्ठताती ॥२॥

रंग माळा सडे गुढीया तोरणे । आनंद किर्तन वैष्ण्ववांचे ॥३॥

असंख्य ब्राम्हण बैसल्या पंगती । विमानी पाहती सुरवर ॥४॥

तो सुख सोहळा दिवाळी दसरा । वोवाळी सोयरा चोखीयासी ॥५॥

ही भूमिका पुन्हा दाखल व्हायला लागली 

ह्या बदलाचे काय करायचे हा माझ्यापुढचा प्रश्न होता जात म्हणजे सर्व दिशांना आढळणारा मॉन्स्टर आहे असं म्हणणाऱ्या व त्यासाठी धर्मांतर करणाऱ्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी हे विपरीत होते नवबौद्ध क्रांती मागे पडून तडजोडवादी व्यूह उदयाला येतोय हे माझ्या लक्ष्यात यायला लागले पुढे वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात पूजा करून हा व्यूह लोकमान्य केला 

मी बौद्ध धारा केवळ नवबौद्धमध्ये अडकून ठेवू इच्छित न्हवतो  माझ्या मते आदिबौद्ध परंपरेनंतर आंबेडकरांनी नवयान समाज स्थापन करून बौद्ध धम्माचे पुरोगामीकरण केले जे कृष्णमूर्तींनी आधुनिक बौद्धधम्म मांडला तर ओशोंनी उत्तराधुनिक श्रमण धम्म  मांडले ज्यात बौद्ध धम्मही येतो ह्या नव्याशी जुळवून घेत आपण चौथ्या नवतेचा बौद्ध धम्म मांडू शकतो का हा माझ्यादृष्टीने पुढचा प्रश्न होता आंबेडकरी साहित्यिकांनी जे कृष्णमूर्ती स्वीकारलेच नाहीत मात्र ओशो हे जैन असल्याने त्यांना स्वीकारार्ह वाटले कारण ओशो परंपरेविरुद्ध बंड करत न्हवते तर बौद्ध परंपरा नव्याने मांडत होते माझा ओशोंच्याबद्दल प्रॉब्लेम असा होता कि ओशो शैवांशी फारसे सलग्न न्हवते ते शंकराला स्थान देण्याऐवजी गोरखनाथांना पहिल्या पाचात ठेवत होते तंत्रसुत्राविषयीचे त्यांचे प्रेम एका अपरिहार्यतेतून आले होते प्रत्यक्षात ते आर्यनच होते मात्र दलित साहित्य जर ओशोंना सामावून घेणार असेल तर माझ्याकडून त्यांचे स्वागत होते कारण बाबासाहेबांच्या पलीकडे जाण्यासाठी ते उपयोगी होते 

वैयक्तिक पातळीवर बौद्ध साधनेने मला हवी असलेली निर्विकल्प जम्प  मिळेना तेव्हा मात्र मी तंत्राकडे वळलो बायका पुन्हा माझ्या आयुष्यात आल्या पण त्यानेही काही झाले नाही हळूहळू बौद्ध धम्म सुटायला लागला पारंपरिक शैव धम्म अपुरा वाटायला लागला 

सुरवातीच्या काळात कोल्हापुरात अंबाबाई व ज्योतिबा जनमानसात इतके रुजलेत कि शैव असणे हा गुन्हा आहे असं मला कधीही वाटलं नाही साहजिकच मी डेकॅथलॉन अनकॅटेगरीत मी शैव कवी होतो मला हा गुन्हा असल्याची जाणीव देशीवाद्यांनी दिली मग मी विठ्ठलावर कविता लिहिल्या पण पंढरपुरात जे मी पाहिले त्याचेच प्रतिबिंब त्यात पडले पुढे बुद्धावरही कविता आल्या वारकरी व महानुभाव ह्यांचा ह्या काळात इतका दरारा देशीवाद्यांनी निर्माण केला होता कि कदाचित त्यामुळेही हे घडले असावे पण मी त्यात अडकलो नाही पुढे सरकलो 

आज अवस्था अशी आहे कि सत्यकथेने १९५५ ते १९७० ह्या काळात जी मराठी साहित्यावर मक्तेदारी निर्माण केली होती तिला मोडून काढून देशीवाद्यांनी त्यापेक्षा भयानक अशी दादागिरी १९८५ ते २०२३ ह्या काळात निर्माण केली आहे ब्राम्हण गेले आणि पाटील आले अशी म्हणावी अशी आजची स्थिती आहे आमची नव्वदोत्तर पिढी तर फुल कापून टाकण्याचा आदेश मिळालाय कि काय असं वाटावं अशी आज स्थिती आहे 

ह्याचे उत्तम उदाहरण शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आहे ही वारकरी दादागिरी अशी आहे कि शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आपले विद्यापीठ अंबाबाई व ज्योतिबाच्या प्रदेशात वसले आहे ही गोष्ट विसरले .  पुढे जाऊन तर ह्या विद्यापीठाने अंबाबाईला महालक्ष्मी बनवण्याच्या प्रयत्नात बौद्धिक साथ दिली वास्तविक कोल्हापूरची शैव लीगसी शोधण्याची पुढे चालवण्याची जबाबदारी ह्या मराठी विभागावर होती पण त्यांनी देशीवादाच्या प्रभावाखाली येऊन ती धुडकावली स्वतःला देशीवादी म्हणवणाऱ्या ह्या लोकांना कोल्हापूरची स्थानिक परंपरा नीट कळू नये ह्या विटंबनेला काय म्हणावे ?

वास्तविक महाराष्ट्राचा मुख्य देव शिव शंकर आहे आणि पांडुरंगही शंकर आहे पण ब्राह्मणधर्मीयांनी व वैष्णवांनी वर्णजातिव्यवस्था आणण्यासाठी विठ्ठलाचे वैष्णवीकरण घडवले वारकरी निर्माण केला आणि आज महाराष्ट्रात त्याचाच प्रभाव आहे पुढेही १९व्या शतकात महाराष्ट्रात जो गीताधर्म निर्माण झाला त्याचाच प्रभाव होता ज्ञानेश्वरचीचा गाजावाजा ह्याच काळापासून सुरु झाला ज्या ब्राम्हणांनी ज्ञाननाथांना वाळीत टाकलं होतं त्यांचाच जयजयकार सुरु झाला ह्याच काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तुकारामाचा गाजावाजा सुरु केला तेव्हा तुकाराम महान असल्याचा साक्षात्कार मराठी समीक्षेला झाला हा वारकरी प्रभाव इतका वाढला कि राजकारणातसुद्धा शरद पवार व बाळासाहेब ठाकरे हे आमचे विठ्ठल आहेत आमचा प्रॉब्लेम बडव्यांशी आहे असं म्हणण्याची रीत रूढ झाली आहे 

हळूहळू ह्या वारकरी प्रभावामुळे नेमाडेंची जात स्वीकारावी मात्र तिची आडवी मांडणी स्वीकारावी उभी नाकारावी ही मांडणी स्वीकारार्ह होत चालली आहे ह्यामुळे जातीवाद वाढणे अटळ आणि तसा तो वाढला आहे वाढत जाणार आहे ह्यातून निर्माण होणाऱ्या भीषणतेची कल्पना आजही अनेकांना येत नाही ही आडवी व्यवस्था उभी करणारा गेम आज ना उद्या अवतरणे अटळ आहे तसे झाले तर काय होईल ह्याची कल्पनाही करवत नाही ब्राह्मणधर्म हा नेहमीच संधीची वाट पाहत असतो नेमाडे व देशीवादाने त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे 

 ब्राह्मणधर्म हा नेहमीच प्रथम वैश्यांना आपल्या बाजूने वळवतो मग क्षत्रियांना ! मोदी व अमित शहा वैश्य असूनही ब्राम्हण धर्मियांनी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही कारण मुळातच वैश्य किंवा क्षत्रिय लोकांना राज्यावर बसवावे आणि आपण पाठीमागून राज्य करावे ही ब्राह्मणधर्मीयांची मानसिकता आहे 

नरेंद्र मोदी हे भारतातले पहिले पंतप्रधान आहेत जे हर हर महादेव म्हणत सत्तेवर आले आहेत साहजिकच शैव  ओबीसींबीसीआदिवासींचा प्रचंड पाठींबा त्यांच्या मागे आहे ब्राह्मणधर्मीयांना हा पाठींबा निवडून येण्यासाठी आवश्यक वाटतो पुरोगामी लोकांना हर हर महादेव म्हणायला लाज वाटते आणि ही आढ्यता त्यांच्या विरोधात गेली आहे एका विदुषीने तर आम्हाला शिवाजी महाराज हवेत पण त्यांचा शैव धर्म नको असे उघड उद्गार काढले होते हा दुतोंडीपणा काही आजचा नाही तो टिळकांच्यापासून चालत आलेला आहे नंतर ह्या विदुषी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटायला गेल्या होत्या 

ह्याचा एक विचित्र परिणामही झाला आहे पुरोगामी नवबौद्ध अचानक शैवांना शत्रू समजायला लागलेत ह्या नवबौद्धांच्या मागे समाज नाही ह्यांचा फक्त गाजावाजा आहे प्रत्यक्षात मत देतांना हा समाज रामदास आठवलेंच्या मागे जातो असे निरीक्षण आहे 

प्रश्न इतकाच आहे कि मोदींचा हा नवा हिंदुत्ववाद हा ब्राह्मणधर्माच्या कवेत जाणार कि समतावाद स्वीकारून जातिवर्णव्यवस्था नष्ट करणार आहे ?

प्रश्न असा आहे कि प्रभावी ठरत चाललेल्या बहुजनांच्या शैव परंपरेला तुम्ही सांस्कृतिक जागा देणार आहात कि नाही ?

अजून तरी मराठी साहित्यिक ह्याबाबत झोपलेले आहेत ते पुरोगामीवादात डुलक्या घेतायत काळ नेहमीप्रमाणे पुढे गेला आहे 

मोदींचा पराभव पुरोगामीवाद्यांच्याकडून होणार नाहीये तो होणार आहे त्यांच्या वाढत चाललेल्या ब्राह्मण्यवादी धोरणांच्यामुळे ! घाबरवून सोडणे ही ब्राह्मण्यवादाची जीवनशैली आहे ती निवडणुकीत फळणार नाही ब्राम्हण्यवाद अंतिमतः बजबजपुरी निर्माण करतो आणि त्यातून दुसऱ्या बाजीरावाचा जन्म होतो पेशवाई ह्या ब्राम्हण्यवादानेच कोसळली मराठी ब्राह्मण्यवाद्यांना त्यावेळीही हे कळलं न्हवतं आणि आत्ताही हे कळतंय असं वाटत नाही मुख्य म्हणजे शैव नाराज होत चाललेत आणि जेव्हा शैव नाराज होतात तेव्हा महाबलाढ्य औरंगजेबसुद्धा कोसळतात 

हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी !

श्रीधर तिळवे नाईक