Wednesday, January 11, 2017

हिंदू कोण ?शैव कोण ? आणि आद्य शंकराचार्य शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक 
हिंदुत्ववाद्यांशी लढायचे असेल तर हिंदू कोण ह्या मूलभूत प्रश्नाचे उत्तर नीट द्यावे लागेल आणि ह्या प्रश्नाचे उत्तर टाळून जर कोणी ही लढाई लढू पाहत असेल तर तो अमूर्त शक्तीशी लढून ही लढाई हरणार हे उघड आहे . आद्य शंकराचार्यांच्यावर लिखाण करण्याचे कारण ह्या प्रश्नाचा शोध घेणे हे होते . फुले आणि आंबेडकरांनी पुरवलेल्या वैचारिक खाद्यावर संतुष्टपणे जगण्याऱ्या विचारवंतांना ह्यांच्या पलीकडे जाणारे चिंतन नकोच आहे त्यामुळे ह्यांच्याशिवाय काही वेगळ्या मांडण्या नकोच आहेत . हिंदुत्ववादाची जेवढी परखड मीमांसा बाबासाहेबानी केली तेवढी कुणीच केली नाही हे खरे असले तरी ही मीमांसा प्रामुख्याने हिंदू धर्माची होती शैव धम्माची न्हवती त्यामुळे बाबासाहेबांच्या विश्लेषणाला मर्यादा पडलेली आहे . बाबासाहेब शैव धम्म आणि हिंदू धर्म ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मानून विश्लेषण करतात , आणि सुलेमान रझवी सारखे अनेक मुस्लिम विचारवंत बाबासाहेबांची री ओढत हिंदू धर्म आणि शैव धम्म ह्यांना एकच मानण्याची चूक करतात . काही शैव विचारवंतांना शैव हे  हिंदूच पण वर्ण नाकारणारे पण जाती  व्यवस्था स्वीकारणारे वाटतात वास्तविक ज्यावेळी हिंदू धर्म अस्तित्वातही न्हवता तेव्हापासून शैव अस्तित्वात आहेत पण हे स्वीकारणे अनेकांना जड जाते . अनेक शैवांना राम आणि कृष्णाचा मोह सुटत नाहीये त्यामुळे असे शैववादी लोकही राम आणि कृष्णाचा आगमवाद दाखवून त्यांना सामील करू पाहतात . ह्यातून शैववादाचे नुकसान होणार कि फायदा हा एक प्रश्नच आहे . ह्या प्रश्नांची उकल करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रत्यक्षात काय घडले हे वस्तुनिष्ठपणे पाहणे भारतातील वैदिक सुरवातीला वर्ण आणि जातीव्यवस्था मानत न्हवते ही वस्तुस्थिती त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतीना आर्य समाजाची स्थापना करता आली पण ही व्यवस्था फार काळ टिकली असे दिसत नाही लवकरच वैदिकांनी स्वतःचे बंदिस्त रूप स्वीकारून ह्या रूपात कोणी शिरू नये म्हणून ब्राह्मण्य निर्माण करून ब्राह्मण धर्माची निर्मिती केली हा ब्राह्मण धर्म
१ वेद हे अपौरेषेय आहेत
२ चार वर्ण आहेत
३ वर्ण जन्माधिष्ठित आणि अपरिवर्तनीय आहेत
४ ब्राह्मण सर्वोच्च असून धर्मनिर्णय करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि अगदी राजालाही हा अधिकार नाही

असे मानत होता .  ह्यातूनच ब्राह्मण आणि शासक  हा सत्तासंघर्ष निर्माण झाला आणि क्षत्रियांनी विश्वशैव , वैष्णव , बौद्ध आणि जैन धर्मांची व धम्माची स्थापना झाली ह्यांचे संस्थापक कपिल , राम कृष्ण , गोतम आणि महावीर हे क्षत्रिय होते ह्यांचे अधःपतन होत गेले म्हणून त्यांना संघटित करावे म्हणून विश्वशैव धारेतून आलेल्या आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली पण वैष्णवांनी हा नवा धर्म आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचे वैष्णवीकरण घडवले आजचा हिंदू धर्म हा आदिशंकराचार्य आणि ह्या वैष्णवीकरणातून घडलेला आहे . ह्याने ब्राह्मण धर्म स्वीकारला आहे आणि त्याची सांगड वरील चार धर्माशी घालून एक नवा धर्म विकसित केला आहे काय आहे हा हिंदू धर्म ?
१ वेद हे अपौरेषेय आहेत
२ स्मृती कायद्याचा आधार आहेत
३ चार वर्ण आहेत असंख्य जाती आहेत
४ वर्ण आणि जात जन्माधिष्ठित आणि अपरिवर्तनीय आहेत
५ ब्राह्मण सर्वोच्च असून धर्मनिर्णय करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि अगदी राजालाही हा अधिकार नाही
६ रोटी आणि बेटी व्यवहार हे फक्त जातीतल्या जातीत व्हावेत
७ अस्पृश्य आणि अस्पृश्यता अटळ आणि अपरिवर्तनीय आहेत
८ जन्म , लग्न आणि मृत्यू ह्यांचे विधी वैदिक मंत्रांनी झाले पाहिजेत  आणि हे विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे . वेळप्रसंगी ब्राह्मणांना वैदिक आणि ब्राह्मणेतरांना पौराणिक मंत्र अशी विभागणी करण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे .
९ मानवाचे मुख्य जीवनउद्दीष्ट मोक्ष आहे
१०  मोक्ष राजयोग , ज्ञानयोग , कर्मयोग आणि भक्तियोग ह्या चारही मार्गांनी मिळतो
जो वरील दहा   गोष्टी स्वीकारतो तो हिंदू होय .
त्याउलट
१ वेद पौरुषेय आहेत आणि त्यांचे प्रमाण मानण्याची गरज नाही . वेद धर्मग्रंथ म्हणून अमान्य .  त्या ऐवजी आगम ग्रंथाचा अभ्यास करणे हे आधिक फलदायक आहे मात्र त्यांनाही प्रमाण मानण्याची गरज नाही
२ स्मृती पूर्णपणे अमान्य
३ वर्ण व  जातिव्यवस्थेला ठाम नकार
४ ब्राह्मण किंवा कुणीही सर्वोच्च नाही
५ रोटी बेटी व्यवहार कूणातही व्हावेत
६ अस्पृश्यतेस ठाम नकार कुणालाही अस्पृश्य मानू नये
७ जन्म , लग्न आणि मृत्यू ह्यांचे विधी  करण्याचा अधिकार सर्वांना  आहे .
८ विधी नाकारण्याचा अधिकारही सर्वांनाच आहे
९ जीवनउद्दिष्ट ज्याने त्याने ठरवावे मात्र मोक्ष वा निर्वाण हेही जीवनउद्दीष्ट असू शकते
१० मोक्ष वा निर्वाण अनेक मार्गांनी मिळू शकतो / शकते

ह्या दहा गोष्टी स्वीकारतो तो शैव होय