Thursday, August 10, 2023

 हरी नरके :फुले विचारांचे व्यवस्थापन गेले 

हरी नरके मला समकालीन होते अन आम्ही दोघेही कॉलेजच्या काळात डिबेटिंग कॉम्पिटिशनला प्रथम भेटलो होतो ह्या प्रथम भेटीतच ह्या माणसाशी उभ्या आयुष्यात आपलं कधी पटणार नाही ह्याची मला जाणीव झाली अन माझ्याबाबतही त्यांचं हेच मत झालं असावं 

आमच्या काळात भारतीय समाजरचना ही ओपन , ओबीसी , दलित व आदिवासी अशा प्रवर्गात स्थित झाली होती ह्यांच्याबाबत माझी शैव विरुद्ध आर्य ही मांडणी त्यांना अमान्य होती 

मुळात त्याकाळात साठोत्तरी विचारवंतांच्या ओबीसी प्रवर्गाबाबत दोन मांडण्या आल्या होत्या १ कर्मठ फुले आंबेडकरवादी २ हिंदू वैदिक मी ह्या दोन्ही साठोत्तरी मांडण्याच्या विरोधात होतो अन हे अनेकजणांना त्याकाळात रुचणारे न्हवते त्यात नरकेही होते 

पुढेही शासनाने स्पॉन्सर केलेला विचारवंत अशीच त्यांची इमेज माझ्यावर आदळत राहिली मात्र त्यांनी केलेलं फुल्यांवरचे काम शासनाच्या मदतीशिवाय कसं शक्य होतं ? मला वाटतं त्यांनी जी वैचारिक कामं हातात घेतली होती त्याला शासनाची मदत लागणार हे त्यांना आतूनच पक्के कळलं होतं नाहीतर समग्र महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले बहुजनांना परवडेल इतक्या कमी किंमतीत कोणता खाजगी प्रकाशक देणार होता ?

मुळात महात्मा फुले व आंबेडकर हे दोघेही ब्रिटिश शासनाच्या आधारेच आपला प्रबोधनाचा प्रोजेक्ट चालवत होते नरके ह्यांनी हेच केलं . किंबहुना संपूर्ण ओबीसी प्रवर्ग हा शासनशरण आहे काय असा एक प्रश्नच निर्माण होत असतो . हे दलित प्रवर्गाला लागू होते काय हा प्रश्न आहे आदिवासी प्रवर्ग मात्र ब्रिटिशांच्याविरुद्ध ठामपणे लढत राहिला आहे 

बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाचा जो आराखडा दिला त्यात ओबीसी दलित व आदिवासी ह्यांनी एकत्र लढणे अभिप्रेत होते मात्र ह्या प्रवर्गाचे नेतृत्व कुणी करायचे ह्या प्रश्नाचे त्यांचे उत्तर बाबासाहेब आंबेडकर असे होते जे मान्य करायला कुणालाच प्रॉब्लेम न्हवता कारण त्यांच्या नेतृत्वात ती उंची होती प्रॉब्लेम आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सुरु झाला एकतर आंबेडकरांनी मृत्यूपूर्वी नवयानी बौद्ध धर्म स्वीकारला तो ह्या तिन्ही प्रवर्गांनी स्वीकारायला हवा का असा प्रश्न निर्माण झाला अन ज्यांना नवयान बौद्ध धम्म मान्य नाही त्यांना आंबेडकरवादी म्हणायचे कि नाही असा दुसरा प्रश्न निर्माण झाला ह्यावर तडजोड म्हणून ज्यांनी सत्यशोधक समाज स्वीकारलाय त्यांना आंबेडकरवादी म्हणून स्वीकारायला प्रॉब्लेम न्हवता पण असा स्पष्ट स्टान्स कुणीच घेतला नाही त्यांच्या नकळतपणे ह्या आराखड्यात नेतृत्व आंबेडकरवादी नवयानी लोकांनीच करायचे असा आदेश असल्यागत काहीजण वावरायला लागले जे अनेक ओबीसींना खटकायला लागले अन आंबेड्करांच्यापासून दूर जायला लागले हरी नरकेंनी अशा लोकांना आंबेडकरांचे महत्व पटवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला पण आंबेडकरवादाची अंतिम परिणीती ही नवयान बौद्ध होण्यातच आहे ही वस्तुस्थिती हळूहळू स्थिर व्हायला लागली अन मला मी नवयानी आंबेडकरवादी नाही असं ठामपणे सांगावं लागलं 

नरके ह्यांनी ओबीसी प्रवर्गाची दिशा आंबेडकरी ठरवल्याने साहजिकच त्यांना आंबेडकरी विचारपीठांनी आपल्या  जागा पुरवल्या मात्र भाजपने जो माधव फॉर्म्युला आणला त्यात दलित प्रवर्ग न्हवता ह्या फॉर्म्युलाने दलित प्रवर्ग हा ओबीसी प्रवर्ग व आदिवासी प्रवर्ग ह्यांच्यापासून वेगळा पाडला मोदींचे ओबीसी नेतृत्व प्रस्थापित झाले अन दलित प्रवर्गापुढे मोदींचे ओबीसी नेतृत्व स्वीकारायचे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला नरके ह्यांनी जीव खाऊन मोदींचा प्रतिकार केला पण परिणाम उलटा झाला ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावला व ते एकाकी पडत गेले 

ओबीसी प्रवर्गाबाबतची दुसरी मांडणी ही प्राचीन काळापासून आगम विरुद्ध निगम अशी आहे साठोत्तरी पिढीत ती वैदिक विरुद्ध हिंदू अशी झाली त्यात ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे वैदिक धर्मी आहेत तर उरलेले ओबीसी दलित आदिवासी हिंदू होते आहेत ह्या मांडणीत वैष्णव किंवा विष्णू मान्य नसणाऱ्या लोकांच्यासाठी रामकृष्ण धर्म व शैव धर्म मिळून हिंदू धर्म होतो पार्थ पोळके ह्यांनी हिंदू विरुद्ध वैदिक ह्या पुस्तकात ही मांडणी केली आहे अलीकडे संजय सोनवणी हे ती विस्ताराने मांडत आहेत नरकेंचे ह्या मांडणीविषयीचे मत काय हे मला अजूनही कळलेलं नाही  मात्र ह्या दुसऱ्या मांडणीविषयी त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता 

ह्या तिन्ही मांडण्यात एक फॅक्टर कॉमन होता व आहे तो म्हणजे  फुले आणि आंबेडकर माझ्या आणि दुसऱ्या तिसऱ्या मांडणीत  शिव कॉमन आहे मी माझ्या मांडणीतून  राम कृष्ण वगळलेले आहेत कारण ते वर्णजातिसमर्थक आहेत आणि हे आंबेडकरांनी स्पष्टपणे सिद्ध करून दाखवले आहे 

हरी नरकेंच्या विचारातला सर्वाधिक चमत्कारिक भाग म्हणजे त्यांनी नेमाड्यांच्या देशीवादाला मतभेदासहित दिलेला पाठींबा ! अनेक ओबीसी लेखक देशीवादाच्या व नेमाडेंच्या भजनी लागले त्यात एक नरकेही होते , एका अर्थाने ते साठोत्तरीचेच एक्स्टेंडेड विचारवंत होते हे त्यांना प्रस्थापितांविषयी असलेल्या आकर्षणातून आले होते का ?

ब्राह्मण्यवादाला त्यांचा जहाल विरोध होता पण ब्राह्मणांना शत्रू मानावे कि नाही ह्याबाबत ते सुरवातीला संभ्रमात होते व उतारवयात जेव्हा त्यांना आपल्याच वर्गाचे कडवट अनुभव आले तसे ते पुरोगामी ब्राम्हणांचा अधिकाधिक आदर करायला शिकले मात्र जेव्हा सनातनी कर्मठ ब्राह्मण्यवाद आढळला तेव्हा ते तुटून पडले अपवाद छगन भुजबळ भुजबळांच्यावरचे त्यांचे प्रेम शेवटी त्यांना गोत्यात आणणारे ठरले भुजबळांच्यासारखा हिंदुत्ववादी चालतो तर मोदींच्यासारखा हिंदुत्ववादी का चालत नाही ह्या ओबीसींच्या प्रश्नाला ते बगल देत राहिले ओबीसी चळवळीनं महात्मा फुल्यांच्यात अडकून पडू नये पुढचं पहावं अशी माझी मांडणी आहे त्यांना हे विचारात मान्य नसावं ते फुल्यांचे अंधभक्त म्हणावेत इतके कट्टर प्रवर्तक होते मंडल आयोगाला प्रथम विरोध करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी काळाची बदललेली पावलं ओळखून पाठींबा दिला तेव्हा काय करायचं असा एक पेचप्रसंग निर्माण झाला नवयानी समाज हा सध्या एका बेटावर राहतोय निदान ओबीसींनी तरी असं बेट निर्माण होऊ देऊ नये असं माझं मत आहे सध्या ओबीसी समाज हिंदुत्ववादी अन विचारवंत सेक्युलर अशी दुफळी पडलीये मोदींच्या हर हर महादेव मागे हा समाज दोन्ही निवडणुकीत गेला अन तो तसा चाललाय ह्याची स्पष्ट जाणीव मला असल्यानेच दोन्हीवेळा मी मोदीच जिंकणार असं प्रेडिक्शन दिलं होतं ते ओबीसी विचारवंतांना आवडलं न्हवतं कारण हे विचारवंत ढगात होते ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि माझ्यावर मी हिंदुत्ववादी असल्याचा स्टॅम्प ह्यांच्यापैकी काहींनी मारला नरके ह्यांनी त्याला मूक संमती दिली मी अर्थातच असल्या गोष्टी नजरेआड करतो 

हरी नरकेंचे खरे योगदान हे त्यांनी फुले आंबेडकर विचारांचे जे व्यवस्थापन  केले व त्याचा प्रचार व्हावा म्हणून जी जीतोड मेहनत घेतली त्यात आहे  त्यांनी फुल्यांच्याबाबत त्यांची तारीख असो किंवा फोटो असो ह्याबाबत काही मूलभूत संशोधन केलं मी त्यांच्या प्रेमात पडलो तो क्षण जेव्हा त्यांनी बाळ गांगल ह्यांच्या फुल्याविषयीच्या  सडकी मांडणीचा प्रभावी प्रतिवाद केला हा होता हा प्रतिवाद त्या काळात फुलेवादी चळवळीसाठी आवश्यक होता 

त्यांचे दुसरे योगदान त्यांनी राखीव जागांचा लढवलेला लढा ! मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ते कायमच निकराने भांडले व पुढेही जेव्हा जेव्हा ह्यावर टाच येण्याची शक्यता आली ते लढले पुढे मराठा आरक्षण प्रश्नाने त्यांची परीक्षा पाहिली . ते कट्टर आरक्षणवादी होते २००० ते २००६  साली वैश्य वाणी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले पण २०११ साली ते मागे घेण्यात आले आणि मोठा वैश्य समाज हिंदुत्ववादाकडे गेला विशेषतः कोकणात नारायण राणेंची ताकद त्याने वाढवली होती आणि काँग्रेसमध्ये राणे गेल्यावर घालवली त्यात हा आरक्षण इश्यू महत्वाचा होता पुढे मराठ्यांच्याबाबत असाच गुंतागुंतीचा प्रकार होत गेला आणि मराठा आणि वैश्य ह्या दोन्ही समाजात त्यांची लोकप्रियता ओहोटीला लागली मात्र दलित समाजात मात्र ती कमी झाली नाही 

मराठीला आर्ष भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न हेही महत्वाचे आहेत ते मराठीसाठी कमालीच्या चिकाटीने लढले 

आमच्या पिढीतल्या परंपरावादी साठोत्तरी लोकांना नेहमीच मान्यता मिळाली ज्यांनी देशीवाद स्वीकारला नवतावादी लोक मात्र वाळीत टाकले गेले नरके प्रबोधनाच्या परंपरेला प्रमाण मानणारे साठोत्तरी देशीवादी विचारवंत असल्याने त्यांनाही मान्यता मिळाली पण अचानक ते हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यावर साईडलाईन व्हायला लागले 

वैयक्तिक पातळीवर मी माझ्या बाजूने दोनदा प्रयत्न केले पण त्यांचे दरवाजे माझ्यासाठी कधीच उघडले नाही माझी संकरित पार्श्वभूमी माझी भगवी वस्त्रे मी एकेकाळी अभिधाचा संपादक होतो म्हणून अभिधानानंतर ग्रुप मीच स्थापन केला हा त्यांचा गैरसमज ह्या ग्रुपमधील संजीव खांडेकरशी असलेले त्यांचे भांडण अन मी संजीवचा खास मित्र आहे अशी त्यांना पटलेली चुकीची खात्री ह्यामुळे त्यांच्यासाठी मी कायमच शत्रू राष्ट्रात होतो मी मात्र त्यांना कधीही विरोधी पक्षात ठेवले नाही आमच्या पिढीत फुले आंबेडकरांची सशक्त मांडणी त्यांच्याइतकी कोणीच केली नसेल अनेकदा आपण पुढे सरकत नसतो कारण लढाई जिवंत ठेवणे हेच आवश्यक बनते त्यांनी फुले आंबेडकर वादाची लढाई जिवंत ठेवली 

त्यांच्या मृत्यूवर संजय सोनवणी व छगन भुजबळ ह्यांची परस्परविरोधी स्टेटमेंट्स आलेत त्यांचा मृत्यू वादग्रस्त व्हावा हे दुर्देव !

त्यांच्या मृत्यूने एक खंदा फुले आंबेडकरवादी योद्धा विचारवंत निघून गेला हे नक्की ! माझी त्यांना आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 




No comments:

Post a Comment