Tuesday, March 21, 2017

गोविंद तळवलकर :अखेरचा रॉयिस्ट चेहरा श्रीधर तिळवे नाईक

भारतातील सर्वात उपेक्षित विचारप्रणालीकार कोणता असा प्रश्न मला कुणी विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर मी मानवेंद्रनाथ रॉय असे देईन जो न्याय बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर  . न्यायमूर्ती रानडे  बॅरिस्टर गोखले ह्यांना मिळाला तो रॉय ह्यांना मिळाला नाही कारण ते लोकायती होते . भारतातील लोकायत दर्शनाची एक प्रदीर्घ परंपरा आहे तिला उजाळा दिला डाव्या लोकांनी! ह्या डाव्या लोकांच्यात स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीने  स्वतःची विचारप्रणाली निर्माण करणारा भारतातील एकमेव डावा विचारवंत म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय ! त्यांना फादर ऑफ इंडियन कम्युनिझम म्हणून ओळखले जाते पण ते मार्क्समध्ये थांबले नाहीत त्यांनी मार्क्सला अधिक काळानुरूप केले आणि स्वतःचा स्वतंत्र रॅडिकल ह्युमॅनिझम जन्माला घातला

ह्या मानवेंद्रनाथांच्या विचारसरणीने मराठीत सहा   रॉयिस्ट चेहरे जन्माला घातले १ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी २ प्रभाकर पाध्ये ३ यशवंतराव चव्हाण ४ द्वा भ कर्णिक ५ व्ही एम तारकुंडे आणि ६ वे  गोविंद तळवलकर तळवलकरांच्या निधनाने रॉयिस्ट विचारप्रणालीतील शेवटचा मराठी चेहरा निखळून पडला आहे  खुद्द रॉय हे स्वामी विवेकानंद आणि बिपीनचंद्र पॉल ह्या कोलकत्ती परंपरेत वाढले होते पण ते तिथे न थांबता जगभर विस्तारत गेले स्टालिनची काळी करणी कळलेले ते पहिले मार्क्सवादी होते आणि नेहरूंना आंधळे मार्क्सवादी होण्यापासून त्यांनी वाचवले होते त्यामुळे साहजिकच नेहरूवादाचा एक पाय गांधीवादी तर दुसरा पाय रॉयवादी होता साहजिकच शेवटी शेवटी तळवलकर नेहरूंच्या विषयी ऑब्सेशन म्हणावे इतके वेडे झाले होते

प्रखर पण सौम्य चेहऱ्याचा बुद्धिवाद हा  रॉयिस्ट चेहऱ्याचा आणि त्यामुळे साहजिकच तळवलकरांचाही विशेष होता मार्क्सवादी हिंसा व एकाधिकारशाही त्यांना अमान्य होती पण युरोपियन प्रबोधन आणि रशियन साहित्य ह्या दोन्ही गोष्टीविषयी त्यांना विलक्षण जिव्हाळा होता प्रखर बौद्धिक विश्लेषण ही त्यांच्या अग्रलेखांची खासियत  होती १९८१ ते १९८५ ह्या दरम्यान रशियात होत असलेल्या कम्म्युनिझमच्या पडझडीविषयी नेमकी खबर असलेले ते एकमेव संपादक होते त्यांच्या काळात म.  टा हा बुद्धिवादाचा मित्र होता आणि अत्यंत सौम्य भाषेत राजकारण्यांची खरडपट्टी काढण्यात प्रवीण होता . राजकारण्यांचे बौद्धिक दिवाळे निघालेले न्हवते त्यामुळे गोविद तळवलकर महाराष्ट्र टाइम्स आपल्याविषयी काय म्हणतात  ह्याची राजकारण्यांनाही फिकीर होती १९६८ ते १९९६ असा प्रदीर्घ काळ ते संपादक होते आणि ह्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा धाक होता . टोलेजन्ग विद्ववता आणि साधी भाषा ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ त्यांच्या लेखात होता . वाचता वाचता हे त्यांचे आमच्या तारुण्यातले एक आवडते सदर होते त्या काळात त्यांना अग्रलेखाचा बादशहा मानले जाई आणि ते त्याला पात्र होते
मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी युरोपियन प्रबोधनाचा जसा इतिहास खोलला तसा गोविंद तळवलकरांनी आपल्या अनेक पुस्तकातून नौरजी ते नेहरू असा इतिहास खोलून दाखवला मला स्वतःला त्यांची सत्तांतर आणि सोविएत साम्राज्याचा उदय आणि अस्त हे दोन बहुभागी ग्रंथ अतिशय आवडतात .

ह्याचा अर्थ त्यांना मर्यादा न्हवती काय ? तर होती त्यांची पिढी भारतीय आणि युरोपियन प्रबोधनात इतकी अडकून गेली कि त्यांना स्वतःच्या आसपास घडणारे प्रतिसृष्टीय बदल सूक्ष्मपणे कळलेच नाहीत त्यामुळे मनमोहनसिंगांनी पुढे जे बदल आणले त्याची तयारी करून घेणे ही जी त्यांच्यावर जबाबदारी होती ती त्यांनी पुरेश्या प्रभावीपणे पार पाडली नाही एकप्रकारे साठोत्तरी मध्यमवर्गीय नोकरदारांची पत्रकारिता हे त्यांचे स्वरूप राहिले मात्र ह्या मर्यादेतही त्यांनी ज्या आंतरिक तळमळीने काम केले तिला तोड नाही . त्यांनी आमच्या पिढीला प्रबोधनाची योग्य अशी पार्श्वभूमी पुरवली आणि मार्क्सच्या अतिरेकी प्रभाव पडण्याच्या शक्यतेपासून कायमचे वाचवले . लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी चौथ्या स्तंभाने काय केले पाहिजे ते त्यांनी त्यांच्या जीवनातून शिकवले . त्यांचा अस्त हा मराठीतील सहाव्या रॉयिस्ट चेहऱ्याचा अस्त आहे त्यांना माझी बुध्दिपूर्ण श्रद्धांजली !

श्रीधर तिळवे नाईक

माझ्या मर्यादित माहितीनुसार ओशोंशी ज्यांचा संबंध आला ते त्यांचे भाऊ गोपीनाथ तळवलकर होते .

शरद पवार हे रॉयिस्ट यशवंतरावांचे शिष्य त्यामुळे ते रॉयिस्ट आणि नेहरूवादी अजेंडाच राबवणार अश्या अटकळीने गोविंदरावांनी शरद पवारांना कायम पाठिंबा दिला पवार सत्ताहीन झाले तर काँग्रेसचे काय हा प्रॅक्टिकल प्रश्न त्यांच्यापुढेही होता आणि नंतरच्या काँग्रेस पुढाऱ्यांनी कणाहीन आणि दिशाहीन राजकारण करून हा प्रश्न अधिकच जटिल बनवला .

शरद जोशींच्या बाबत तळवलकर साफ चुकले किंबहूना त्यांना पर्सनल खुन्नस होती कि काय असे वाटण्यापर्यंत गडबड होती मी माझ्या लेखात म्हंटल्याप्रमाणे मध्यमवर्गीय नोकरदाराची पत्रकारिता असेच त्यांच्या पत्रकारितेचे स्वरूप होते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना कळत होते असे वाटत नाही . नेमाडे न कळण्याचे कारणही हेच होते नेमाडेंनी आयुष्यभर त्यामुळेच मटा ची टर उडवली ते एका अर्थाने पूर्ण मार्गी होते देशीवाद त्यांना कळलाच नाही

तळवलकरांनी टीका प्रधान बनवली वगैरे चूक आहे आचार्य अत्रेंनी घणाघाती व अर्वाच्य टीकेचे जे स्कूल चालू केले त्याला उलट प्रभाकर पाध्ये व तळवलकरांनी पायबंद घातला
श्रीधर तिळवे नाईक







No comments:

Post a Comment